लखनौ सुपर जायंट्स विजयाच्या ट्रॅकवर, दुसऱ्या सामन्यात हैदराबादला पराभूत

Share

आयपीएल 2025 स्पर्धेतील सातव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना सुरु होण्यापूर्वी हैदराबादची हवा होती. पण लखनौ सुपर जायंट्सने त्यांच्या होमग्राऊंडवर जाऊन त्यांना पराभूत केलं.

आयपीएल 2025 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. हा सामना सुरु होण्याआधी सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांची दहशत होती. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर ऋषभ पंतने प्रथम फलंदाजी घ्यावी असं अनेकांचं मत होतं. पण ऋषभ पंतने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचं निर्णय घेतला. सनरायझर्स हैदराबाद धावांचा डोंगर रचणार असं वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. शार्दुल ठाकुरने पॉवर प्लेमध्ये सनरायझर्स हैदराबादचं कंबरडं मोडलं. अभिषेक शर्मा आणि इशान किशनची विकेट काढली. त्यामुळे धावगती मंदावली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विकेट पडत गेल्या. ट्रेव्हिस हेडकडून फार अपेक्षा होत्या. पण त्यालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. 28 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 47 धावा करून बाद झाला. प्रिंस यादवने त्याची विकेट काढली. हैदराबादकडून ट्रेव्हिस हेडने सर्वाधिक धावा केल्या. यासह विजयासाठी 20 षटकात 191 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान 5 गडी गमवून 17 व्या षटकात लखनौने पूर्ण केलं.

सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी दिलेलं आव्हान गाठताना लखनौला पहिला धक्का बसला. संघाच्या 4 धावा असताना एडन मार्करम 1 धाव करून बाद झाला. त्यानंतर मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांनी मोर्चा सांभाळला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली. निकोलस पूरनने 26 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकार मारत 70 धावा केल्या. पूरन बाद झाल्यानंतर मिचेल मार्शने मोर्चा सांभाळला. त्याने 31 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. तीन विकेट पडल्यानंतर ऋषभ पंत आणि आयुष बदोनी ही जोडी मैदानात राहिली. ऋषभ पंत या सामन्यातही आक्रमक आणि साजेशी खेळी करण्यात अपयशी ठरला. फक्त 15 धावा करून बाद झाला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), डेव्हिड मिलर, आयुष बडोनी, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, आवेश खान, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Floating Button Join Group