आता मुंबईकरांची क्लिनअप मार्शलकडूनची लूट थांबणार

Share

मुंबई : मुंबईकरांची एकप्रकारे लुट करणाऱ्या क्लीन अप मार्शलबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने त्यांना दिलेल्या दंडात्मक कारवाईचे अधिकार काढून घेत त्यांची सेवाच खंडित करण्यात येत असल्याची अधिकृत घोषणा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी केली आहे. ही सेवा खंडित करण्याचे निर्देश दिल्यानंतर संबंधित ‘क्लीनअप मार्शल’ म्हणून नेमण्यात आलेले प्रतिनिधी आणि संबंधित संस्थांची सेवा ४ एप्रिल २०२५ पासून खंडीत करण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे आता क्लीनअप मार्शलकडून होणारी मुंबईकरांची लूट बंद होणार असून उलट नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत संबंधित संस्थांनाच दंड आकारणी करण्यात येणार आहे.

‘स्वच्छ मुंबई अभियान’ अधिकाधिक लोकाभिमुख व्हावी, नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे, यासाठी महानगरपालिका विविध प्रकारे कार्यवाही तसेच जनजागृती करीत असते. यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘क्लीनअप मार्शल’ हा उपक्रम राबविण्यात येत होता. मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये क्लीनअप मार्शल नियुक्त करण्यात आले होते. प्रत्येक प्रशासकीय विभागात विविध १२ संस्थांमार्फत प्रत्येकी ३० क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्यात आली होती. या योजनेच्या अंमलबजावणीचे नियम व तत्वे देखील ठरवून देण्यात आले होते.

क्लीनअप मार्शल यांनी मागील वर्षभराच्या कालावधीमध्ये ४ कोटी ९३ लाख ७३ हजार ७१२ रुपयांचा दंड वसूल केला. हा दंड वसूल करीत असतांना संबंधीत मार्शल यांनी नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, त्यांना स्वच्छतेसंबंधित नियमांचे पालन करण्यास सांगणे अपेक्षित होते. मात्र महानगरपालिका प्रशासनाकडे प्राप्त तक्रारींनुसार संबंधित मार्शल यांनी विविध नियमांचा भंग केल्याचे दिसून आले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Floating Button Join Group