समुद्रालगतची जागा महसूल विभागाकडून बृहन्मुंबईकडे जागा लवकर हस्तांतरण करा; उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या महसूल विभागाला सूचना
मुंबई : दादर येथील अशोकस्तंभ ते चैत्यभूमीपासुन इंदूमिल पर्यंत समुद्रालगतचा रस्ता तयार करण्यासाठी महसूल विभागाकडून बृहन्मुंबईकडे जागा हस्तांतरण प्रक्रिया जलद गतीने करा,त्यासाठी पर्यावरण विभाग व इतर बाबींची परवानगी घ्या अश्या सूचना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिल्या आहेत. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या दालनात आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी त्यांनी महसूल विभाग, व मुंबई महापालिका प्रशासनाला या सूचना केल्या आहेत.
यावेळी उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, इंदू मिल चैत्यभूमी आणि अशोक स्तंभ ही केवळ स्मारक किंवा बांधकाम नसून बौद्ध समाजाची आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची अस्मिता जगासमोर मांडणारी ऐतिहासिक ठिकाणे आहेत.अशोकस्तंभ ते चैत्यभूमीपासुन इंदूमिल पर्यंत समुद्रालगतचा रस्ता झाल्यास लाखो अनुयायांना याचा फायदा होईल.
अशोकस्तंभ ते चैत्यभूमी मुख्य स्तुप पासून इंदुमिल पर्यंत समुद्राकडील बाजुची जमीन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करणे आणि चैत्यभूमी पासून (जी/उत्तर विभागातील) इंदूमिल पर्यंतचा रस्ता तयार करणे, परिसर सुशोभीकरण करणे याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.यावर महसूल विभाग,पर्यावरण विभाग,मुंबई महालिका प्रशासन,एमएमआरडीएने या रस्त्याच्या उभारणीसाठी तत्काळ कार्यवाही करण्याची तयारी दर्शवली आहे.
या बैठकीसाठी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी,पर्यावरण सचिव जयश्री भोज,संचालक डॉ.अ.म.पिंपरकर, इंदुमिल आर्किटेक शशी प्रभू, नागसेन कांबळे,डॉ.भंदत राहूल बोधी व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
