मुंबई : नेत्वा धुरी
बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहाच्या काळात वाघीणीने चक्क पाच नव्या बछड्यांना जन्म दिला आहे. २ ऑक्टोबर रोजी श्रीवल्ली या वाघीणीने तिस-यांदा बछड्यांनाा जन्म दिला आहे. याचदरम्यान, रत्नागिरीतील देवरुख येथे सापडलेला काळ्या बिबट्या उद्यानात दाखल झाला आहे. उद्यानात जन्मलेले बछडे गुजरातमधील सिंह मिळवण्यासाठी रवाना केले जाणार आहेत. मात्र काळ्या बिबट्या थेट वनतारामध्ये जाईल, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. काळ्या बिबट्याच्या आगमनाबाबत कमालीची गुप्तता पाळल्याने संशयाला वाव मिळाला आहे.
२ ऑक्टोबर रोजी श्रीवल्ली वाघीणीची प्रसूती
जून महिन्यापासून श्रीवल्ली आणि बाजीराव या वाघ-वाघीणीच्या जोडीचे मिलन सुरु होते. याचदरम्यान मीलन यशस्वी झाल्याने श्रीवल्ली गर्भवती राहिली होती. तपासणीदरम्यान यंदा तिला पाच बछडे असल्याची खात्री उद्यानातील पशुवैद्यकीय अधिका-यांनी व्यक्त केली होती. अखेरीस २ ऑक्टोबर रोजी श्रीवल्लीने पाच बछड्यांना जन्म दिला. याआधी दोन वर्षांपूर्वी श्रीवल्ली वाघीणीची पहिल्यांदा प्रसूती झाली. पहिल्यांदाच प्रसूतीचा अनुभव असलेल्या श्रीवल्लीचा केवळ एक बछडा वाचला.

गेल्या वर्षी श्रीवल्ली वाघीणीने दुस-यांदा बछड्यांनाा जन्म दिला. चार बछड्यांपैकी एका बछड्याचा मृत्यू झाला. तिस-या वेळी पहिल्यांदाच श्रीवल्लीने पाच बछड्यांना जन्म दिल्याने उद्यान प्रशासनाकडून खबरदारीची पावले उचलली जात आहेत. श्रीवल्लीची जिवंत राहिलेली चारही बछडे मादी असल्याने यापैकी एका वाघीणीला तसेच उद्यानातील दुस-या वाघाला गुजरातला दिले जाईल. गुजरातकडून सिंहाची जोडी मिळावी याकरिता उद्यान प्रशासनाने अगोदरच प्रक्रिया पूर्ण केली आहे. याअगोदर गुजराकडून उद्यान प्रशासनाने सिंहाची दोन जोडी आणली आहेत.
का बिबट्या काही महिन्यांचा मुंबईकर?

ऑगस्ट महिन्यात रत्नागिरी येथील संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव येथे देवरुख रत्नागिरी रस्त्यावर काळ्या बिबट्याचे पिल्लू आढळून आले होते. अंदाजे वर्षभराचा नर बिबट्या उपासमारीमुळे रस्त्यावरच निपचित पडून होता. देवरुख येथील प्राथमिक उपचार केंद्रात त्याच्यावर उपचार सुरु होते. बिबट्याच्या पिल्लाची रवानगी सातारा येथील कराडमधील वन्यजीव उपचार केंद्रात करण्यात आली. तिथे महिनाभर उपचार दिल्यानंतर बिबट्याच्या पिल्लाला मुंबईत हलवण्यात आले आहे.
२ ऑक्टोबर रोजी श्रीवल्ली वाघीणीने पाच बछड्यांना जन्म दिला. त्याचवेळी डॉ. निखील बनगर यांनी उद्यानात काळ्या बिबट्या आणल्या. त्यांच्यादेखरेखीखाली बिबट्यावर उपचार सुरु आहेत. बिबट्याच्या पंज्याला जखम आहे. बिबट्याच्या पिल्लावर दोन शस्त्रक्रिया कराव्या लागतील. किरण पाटील, विभागीय वनाधिकारी, दक्षिण विभाग, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान