मतदार यादी, आरक्षण सोडतीचे वेळापत्रक जाहीर
मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. २४७ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायती यांच्या निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे, तर ३२ जिल्हा परिषदा (ZP) आणि ३३६ पंचायत समितींच्या (PS) सदस्यपदाच्या आरक्षणासाठीची सोडत १३ ऑक्टोबर २०२५ रोजी काढण्यात येणार आहे.
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार असल्याने राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे.
नगरपरिषद/नगरपंचायतींच्या मतदार यादीचे वेळापत्रक
नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी १ जुलै २०२५ पर्यंत अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी वापरली जाणार आहे.
- प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी: ८ ऑक्टोबर २०२५.
- हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत: १३ ऑक्टोबर २०२५.
- अंतिम मतदार यादी जाहीर: २८ ऑक्टोबर २०२५.
मतदार याद्यांमध्ये नावे वगळणे किंवा समाविष्ट करणे आयोगाकडून केले जात नाही; मात्र, लेखनिक चुका, प्रभागातील बदलांमुळे होणाऱ्या दुरुस्त्यांसाठी मतदार हरकती नोंदवू शकतात.
जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समिती (PS) आरक्षण सोडत
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्याच्या सोडतीची तारीख जाहीर केली आहे.
- आरक्षण सोडतीची सूचना: संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून १० ऑक्टोबर २०२५ रोजी वृत्तपत्रांत प्रसिद्ध केली जाईल.
- आरक्षण सोडत: १३ ऑक्टोबर २०२५.
- प्रारूप आरक्षणावर हरकती दाखल करण्याची मुदत: १४ ते १७ ऑक्टोबर २०२५.
- अंतिम आरक्षण प्रसिद्धी: ३ नोव्हेंबर २०२५ रोजी शासन राजपत्रात केली जाईल.