पूरग्रस्तांसाठी काँग्रेस ३ ऑक्टोबरला राज्यभर आक्रमक आंदोलन करणार
मुंबई: अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्यास महाभ्रष्ट महायुती सरकारने केलेल्या दिरंगाईमुळे काँग्रेस पक्ष आता थेट रस्त्यावर उतरणार आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे डोळेझाक करणाऱ्या या ‘मुक्या-बहिऱ्या’ सरकारला जागे करण्यासाठी शुक्रवार, ३ ऑक्टोबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर काँग्रेसकडून जोरदार आंदोलन पुकारण्यात आले आहे.
गेल्या महिनाभरात राज्यात १०० लाख हेक्टरहून अधिक शेतीपिके, फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. लाखो शेतकरी कुटुंबे बेघर झाली असून अन्नधान्याची आणि वस्तूंची मोठी नासाडी झाली आहे. या गंभीर संकटातही सत्ताधारी महायुती सरकारने अद्याप कोणतीही ठोस मदत जाहीर केलेली नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या या ‘सत्तेच्या मस्तीत मदमस्त’ झालेल्या सरकारविरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार, काँग्रेसने ओला दुष्काळ तातडीने जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच, प्रति हेक्टर किमान ५० हजार रुपये मदत आणि विधानसभा निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी त्वरित करण्याची मागणी पक्षाने लावून धरली आहे.
शुक्रवारी, ३ ऑक्टोबर रोजी राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये मोर्चा आणि धरणे आंदोलन आयोजित करण्यात येणार असून, जिल्हास्तरावर प्रशासनाला निवेदन देऊन सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या या जीवन-मरणाच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष अत्यंत संतापजनक असून, काँग्रेसचे हे आंदोलन महायुती सरकारला चांगलेच अडचणीत आणण्याची शक्यता आहे.