सहाय्यक पोलीस निरीक्षकावर तात्काळ कारवाई करा!
मुंबई : Journalism is in danger due to police high-handedness गणेश विसर्जनाच्या पवित्र उत्सवाचे वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकारावरच पोलिसांच्या दंडेलशाहीचा क्रूर हल्ला झाला आहे. साम टीव्हीचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांना केवळ वाहन पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम अंबाजी नाईक यांनी कानशिलात लगावून मारहाण केली. ही घटना पोलिसांच्या असंवेदनशील आणि पत्रकारितेच्या स्वातंत्र्याला पायदळी तुडवणाऱ्या वृत्तीचा क्रूर नमुना आहे.
विविध संघंटनांनी दिले निवेदन Journalism is in danger due to police high-handedness.
या गंभीर घटनेनंतर महाराष्ट्रातील पत्रकार संघटनांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ, टीव्हीजे, मुंबई प्रेस क्लब, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, विधीमंडळ वार्ताहर संघ आणि पत्रकार हल्ला कृती समितीसह अनेक संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या सर्व संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे.
टीव्हीजे संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत. याचप्रमाणे, गृहराज्यमंत्र्यांनीही चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, केवळ आश्वासनांवर आता पत्रकारांचा विश्वास बसणार नाही. राज्यात पत्रकारांवरील हल्ल्यांची संख्या वाढत असताना केवळ चौकशीचे आदेश देऊन सरकार या प्रश्नाची गांभीर्यता नाकारत आहे का, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
समाजाचा आरसा म्हणून काम करणाऱ्या पत्रकारालाच जर संरक्षण नसेल, तर लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून पत्रकारिता कशी टिकेल? शांताराम नाईक यांच्यासारख्या बेजबाबदार अधिकाऱ्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करून त्याला योग्य शिक्षा दिली पाहिजे. सरकारने केवळ आश्वासन न देता, ठोस कारवाई करून पत्रकारांना सुरक्षितता देण्याची गरज आहे. अन्यथा, पत्रकारितेचे स्वातंत्र्य संपुष्टात येऊन लोकशाहीचा गळाच दाबला जाईल!