घटनेचा व्हिडिओ अखेरिस ‘महा महालक्षवेधी’च्या हाती
नेत्वा धुरी
मुंबई : crocodile attack on human in SGNP बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कान्हेरी गुंफेजवळील मगरीला पकडणे वनाधिका-यांच्या अंगलट आले आहे. शुक्रवारी उद्यानातील वन्यप्राणी बचाव गटाचे सदस्य राजेंद्र भोईर यांच्यावर मगरीने हल्ला केला. या हल्ल्यात भोईर यांच्या हातावर मगरीचे दात रुतले. महिन्याभरात भोईर यांच्यावर वन्यप्राण्यांकडून दुस-यांदा हल्ला झाला. या घटनेचा व्हिडिओ महालक्षवेधीच्या हाती लागला आहे.
प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ crocodile attack on human in SGNP
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मगरीला पकडताना वन्यप्राणी बचाव पथकाचे प्रमुख निकेत शिंदे, तुळशी विभागाचे वनपरिक्षेत्रपाल अधिकारी नरेंद्र मुठे तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले उपस्थित नव्हते. मगरीला पकडण्याबाबत उद्यानाच्या मुख्य वनसंरक्षक आणि संचालिका अनिता पाटील यांनाही कल्पना दिली गेली नव्हती. तुळशी वनपरिक्षेत्र तसेच व्याघ्र व सिंह विहार यांच्यासह वन्यप्राणी बचाव पथक या सर्वांची चौकशी सुरु झाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर उद्यान प्रशासनाने कोणतीही अधिकृत माहिती देण्यास नकार दिला आहे.
शुक्रवारी अप्पर कान्हेरी गुंफा येथील पाण्याच्या डोहात आलेल्या मगरीला पकडण्यासाठी वन्यप्राणी बचाव पथकाची टीम घटनास्थळी दाखल झाली. या जागेवर पर्यटकांना फेरफटका मारण्यासाठी प्रवेश दिला जातो. वीकेण्डला पर्यटकांची गर्दी वाढते. या दिवसांत मगरीने पर्यटकावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून वनाधिका-यांनी मगरीला पकडण्याचा निर्णय घेतला.
मगरीला पकडण्यासाठी वन्यप्राणी बचाव पथकाची टीम पाण्यात उतरली. मगरीला पथकाने सर्व बाजूंनी घेराव घातला. अचानक मगरीने पाण्यातूनच भोईर यांच्या हाताचा चावा घेतला. ही घटना वनाधिका-यांच्या मोबाईलमध्ये कैद झाली. गेल्या महिन्यात वाघाच्या हल्ल्यात भोईर यांना पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वनाधिकारी निकेत शिंदे यांनी औषधासाठी पाणी तसेच फळही देण्यास नकार दिल्याने वरिष्ठांनी त्यांची चांगलीच कानउघडणी केली. वनमजूराला मिळालेल्या अपमानास्पद वागणूकीबाबत महालक्षवेधीने वाचा फोडली.
उद्यानाला सातत्याने बदनामीला सामोरे जावे लागत असल्याने यावेळी वनाधिका-यांनी भोईर यांना नजीकच्या श्रीकृष्णा या खासगी रुग्णालायत उपचारांसाठी दाखल केले. चाव्यामुळे हातातील रक्तस्त्राव थांबण्यासाठी त्यांना अॅडमिट करावे लागले. जखम गंभीर नसल्याने भोईर यांना शनिवारी सायंकाळी उशिराने डिस्चार्ज दिला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. कान्हेरी गुंफेचा परिसर तुळशी परिक्षेत्रात मोडतो. मगरीचा वावर दिसून आल्याने आम्ही वन्यप्राणी बचाव पथकाला परिस्थितीची पाहणी करायला सांगितले होते.
मगरीला पकडण्याचा निर्णय पथकाने परस्पर घेतला. मगरीने केलेल्या हल्ल्यानंतर आम्हांला संपूर्ण घटनेची कल्पना आली, असे तुळशी परिक्षेत्रातील अधिका-यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. आम्ही स्वतःहून मगर पकडण्याचा निर्णय घेतला नाही. तुळशी परिक्षेत्रातील वनपालांनी स्वतः व्याघ्र आणि सिंहविहार कार्यालयात भेट दिली होती. त्यांनी मगर पकडण्याविषयी आम्हांला कळवले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओदेखील असल्याचा दावा व्याघ्र व सिंह विहार कार्यालयातून करण्यात आला.
उद्यानातील दोन्ही विभागातील अधिका-यांकडून आरोपांची चालढकल होत असताना वनसंरक्षक व संचालिका अनिता पाटील चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी संपूर्ण घटनाक्रमावर चौकशी अहवाल मागितला असून, वन्यप्राणी बचाव पथकातील काही सदस्यांना बदलण्याचा निर्णय घेतल्याचीही चर्चा सुरु आहे.
प्राणीरक्षकाची वाघाच्या पिंज-यावरुन हकालपट्टी
राजेंद्र भोईर यांना गेल्या महिन्यात २२ जून रोजी पिंज-यात बंदिस्त वाघाने जीवघेणा हल्ला केला. बाजीराव या वाघाच्या उपचारादरम्यान त्याने भोईर यांचा हात तोंडात पकडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली. महालक्षवेधीने ही घटना उघडकीस आणल्यानंतर भोईर यांना वाघांच्या पिंज-याजवळ जाण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाघ आणि मगरीने सारख्याच हातावर हल्ला केल्याने डॉक्टरांनी भोईर यांना अॅडमिट करुन घेतले. भोईर यांच्या तब्येतीत सुधारणा दिसून आहे, मात्र वरिष्ठ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच डिस्चार्जबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे रुग्णालयातील एका कर्मचा-याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.