maharashtra forest; दिल्लीवारीला निघालेल्या वनाधिकाऱ्याविरोधात दोन महिला अधिकाऱ्यांची थेट वनमंत्र्यांकडे तक्रार

Ganesh Naik
Share

तक्रारीत सत्यता आढळल्यास कारवाईचे वनमंत्र्यांनी दिले संकेत

नेत्वा धुरी
मुंबईः maharashtra forest मुंबईतील बोरिवली येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय तसेच वनविभागात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या दोन महिला अधिकाऱ्यांनी पश्चिम वन्यजीव विभागाचे तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लमेंट बेन यांच्याविरोधात वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे तक्रार केली आहे. कार्यालयीन कामकाजात नियमबाह्य कृती करत आपल्याला मानसिक छळवणूक केल्याचा आरोप दोन्ही पीडीत महिलांनी केला आहे. या दोन्ही महिलांच्या तक्रारींची दखल वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतली असून, चौकशीचे आदेश दिले आहेत. या तक्रारीत तथ्य आढळल्यास योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी महालक्षवेधीशी बोलताना दिली.

page 2
पिडीतांची तक्रार काॅपी

कारणे दाखवा नोटीस जारी maharashtra forest

वनविभागाने तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ. क्लेमेंट बेन यांना महिला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत कारणे खुलासा सादर करण्याची नोटीस जारी केली आहे. डॉ. क्लमेंट बेन यांची बदली दिल्लीतील केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणात सदस्य सचिव म्हणून झाली आहे. १७ जून रोजी वनविभागाने त्यांना अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (पश्चिम वन्यजीव) या पदापासून मुक्त केल्याने त्यांना एका प्रकरणात कारवाईपासून मुक्तता मिळत असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. दोन्ही पीडीत महिलांचे लेखी तक्रार पत्र आणि संबंधित कागदपत्रे महालक्षवेधीकडे उपलब्ध आहेत.

महिला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची तक्रार

सदर पीडीत महिला गेल्या दोन वर्षांपासून वनविभागात सध्याच्या नियुक्ती पदावर पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. या महिला पशुवैद्यकीय अधिकारी यांचे काम असमाधानकारक असल्याची लेखी पत्र डॉ. क्लेमेंट बेन यांनी पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाकडे केली होती. वास्तविक महिला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे कामकाजाबाबत संबंधित राष्ट्रीय उद्यानातील संचालकांनी कधीच तक्रार केली नव्हती. संबंधित महिला पशुवैद्यकीय अधिका-याचा वन्यप्राणी उपचारांचा चांगला अनुभव आहे. वन्यप्राण्यांवरील उपचारांचे कामही यशस्वीरित्या सुरु आहे. पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून मुदतवाढ दिली जावी, असे लेखी पत्र संबंधित राष्ट्रीय उद्यानाचे माजी संचालक व मुख्य वनसंरक्षकांनी यंदाच्या जानेवारी महिन्यात डॉ. बेन यांच्याकडे केली होती. हे शिफारस पत्र मिळताच डॉ. बेन यांनी २५ मार्च रोजी थेट पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाच्या प्रधान सचिवांकडे संबंधित महिला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे काम समाधानकारक नसल्याची तक्रार केली.

डॉ. क्लेमेंट बेन यांच्या कार्यक्षेत्रात संबंधित पशुवैद्यकीय अधिका-याच्या कामाबाबतची अहवाल किंवा तक्रार करणे येत नाही, असा आरोप करत पीडीत महिला पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने थेट वनमंत्री गणेश नाईक यांना लेखी तक्रार केली. २३ एप्रिल रोजी पीडितेने वनमंत्री गणेश नाईक यांना लेखी पत्र देत डॉ. क्लेमेंट बेन आपला मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला. माझ्या दैनंदिन कामात क्लेमेंट बेन वरिष्ठ नाहीत. त्यामुळे माझे काम असामाधानकारक असल्याचे कोणत्या आधारावर म्हटले गेले, असा संतप्त सवालही त्यांनी या लेखी तक्रार पत्रात उपस्थित केला.

महिला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रकरण अंगलट

या तक्रारीची दखल घेत वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम.श्रीनिवास राव यांनी २८ एप्रिल रोजी खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. संबंधित महिला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांबाबत त्याच कार्यालयामार्फत माहिती देणे अपेक्षित असताना डॉ. बेन यांनी परस्पर पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाशी पत्रव्यवहार केल्याबद्दल आक्षेप ठेवण्यात आला आहे.

कार्यालयातील महिला अधिकारी अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत

संबंधित पिडीत महिला अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयात वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक पदावर कार्यरत आहे. डॉ. क्लेमेंट बेन यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची थेट तक्रार या पीडीतेने वनमंत्री गणेश नाईक यांना लेखी पत्राद्वारे केली. हे पत्र पिडीत महिलेने ११ एप्रिल रोजी ठाण्यातील जनता दरबार कार्यक्रमात सुपूर्द केले. आपण तृतीय श्रेणीतील कर्मचारी असताना बेन यांनी प्रथम श्रेणीतील कार्यालयातील स्विय सहाय्यक दत्तात्रय गुजले यांना आपल्याकडील काम दिले. डॉ. बेन यांनी रामसिंग राय या नावाच्या व्यक्तीकडून माझी बदली करण्याच्या उद्देशाने कार्यालयात तक्रार दाखल करुन घेतली असल्याची तक्रार पिडीत महिलेने वनमंत्र्यांना केली. रामसिंग राय नामक व्यक्ती अस्तित्वात नसल्याचा दावा पीडितेने केला.

आरोपांवर दुर्लक्ष

दोन्ही पीडीत महिलांच्या प्रकरणात महालक्षवेधीकडून डॉ. क्लेमेंट बेन यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी त्यांना फोन, मॅसेज आणि वनविभागाच्या अधिकृत आणि त्यांच्या खासगी ईमेलवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group