Msrtc; नियोजनाच्या अभावामुळे ऐन उन्हाळी हंगामात एसटीचे अपेक्षित उत्पन्न बुडाले

Share

सातारा : (Msrtc) उन्हाळी हंगाम संपत आला तरी सुद्धा एसटीला अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात अपयश येताना दिसत असून प्रतिदीन तीन कोटींनी उत्पन्नात कमी मिळत असल्याचे दिसून येत असल्याचे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेस भवन, सातारा येथे एसटी कामगारांच्या बैठकीचे आयोजन Msrtc

14.95 टक्के इतकी भाडेवाढ केली असताना उद्दिष्टांच्या प्रमाणे 1 ते 8 मे या ऐन उन्हाळी हंगामातील उत्पन्नाचा आलेख पहिला तर प्रतिदिन सरासरी 34 कोटी रुपये इतके उत्पन्न मिळायला हवे होते. पण प्रत्यक्षात मात्र  31 कोटी  रुपये इतके उत्पन्न  प्रतिदिन मिळाले असून ऐन उन्हाळी हंगामात अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात व्यवस्थापनाला अपयश आले आहे. अजूनही प्रतिदिन 3 कोटी रुपयांनी उत्पन्न कमी मिळत असल्याचे दिसून येत असून राज्य भरातील एसटीच्या एकूण उत्पन्नाचा एकूण आढावा घेतला तर 1 ते 8 मे या कालावधीत उद्दिष्टा प्रमाणे फक्त नागपूर विभागाने उत्पन्न मिळविले आहे. बाकी कुठल्याही विभागाला अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात यश मिळाले नसून वाहकाने उत्पन्न कमी आणले तर त्याला विचारणा होते मग प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे हे घडत असताना सुद्धा कुणावरही कारवाई का केली जात नाही? असा सवालही बरगे यांनी वेळी बोलताना केला.

मध्यवर्ती कार्यालयाच्या आदेशाला केराची टोपली

कामकाज सुरळीत पार पडावे, व उत्पन्न वाढीत मदत व्हावी यासाठी अनेक विभागात बढती परीक्षा घेण्यात आल्या असून वाहतूक नियंत्रक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक पदाची बढती परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना ऐन उन्हाळी हंगामात बढती देण्यात आली नाही .मार्ग तपासणी पथक किंवा चालक, वाहकाना कामगिरी लावण्यासाठी सहाय्यक वाहतूक निरीक्षक या पदातील बढती परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्याना वापरण्याचे मध्यवर्ती कार्यालयाचे आदेश असताना सुद्धा अजूनही त्यांना वापरले जात नाही.हे दुर्दैवी असून उत्पन्न मिळावे व कामकाज सुरळीत होण्यासाठी बढती परीक्षा घेण्यात आल्या आहेत. पण त्यांचा वापर करण्यात येत नसून या विषयात  प्रशासन सपसेल अपयशी ठरल्याचेही बरगे यांनी यावेळी सांगितले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एसटीसाठी आश्वासक चेहरा

एसटी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित सात टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा हल्लीच एसटीचे अध्यक्ष व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली असून कर्मचाऱ्यांची इतर थकीत देणी सुद्धा देण्याचा प्रयत्न ते नक्की करतील असे त्याच्या एकंदर त्याच्या कामाच्या पद्धतीवरून दिसत आहे.पाच वर्षात पंचवीस हजार नवीन स्व मालकीच्या गाड्या घेण्याचा परिवहन मंत्र्यांचा निर्णय अभिनंदनीय स्वागताहार्य असून या निर्णयामुळे एसटी नफ्यात येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

या बैठकीला संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष शेखर कोठावळे, प्रादेशिक सचिव समीर डांगे,विभागीय सचिव गणेश निकम, प्रकाश कदम, सचिन जगताप, महादेव शिंदे, सागर कणसे, राम लांब, कैलास माने, अतुल सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group