मुंबई : (Rahul Narvekar) महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे आणि आमदार निवासातील कर्मचारी वर्गाचे आरोग्य सुस्थितीत राहावे, त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ़ व्हावी, या उद्देशाने जिजाऊ सामाजिक संस्था आणि जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या सहकार्याने आमदार निवासात मोफत महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
जिजाऊ संस्थेच्या या सेवाभावी उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक (Rahul Narvekar)
या महाआरोग्य शिबिराला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भेट देऊन आरोग्य तपासणी केली. तसेच शिबिरामधील विविध तपासणी विभागांना भेट देत पाहणी केली. जिजाऊ संस्थेच्या या सेवाभावी उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत, “समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणारे उपक्रम हे केवळ सेवा नसून परिवर्तनाचे खरे साधन आहेत. मंत्रालयीन कर्मचारी आणि आमदार निवासातील कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः अशा शिबिरांचे आयोजन हे निश्चितच उल्लेखनीय व अनुकरणीय आहे.” अशा भावना व्यक्त केल्या.
या शिबिरात ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. २०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना मोफत चष्मे वितरित करण्यात आले, तर २५० हून अधिक रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. याशिवाय मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड, हाडांचे विकार, स्त्रीरोग, बालरोग, कॅन्सर तपासणी यांसारख्या आजारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली तपासण्या घेण्यात आल्या. महिलांसाठी स्वतंत्र तपासणी कक्ष तयार करण्यात आला होता. जेथे महिला कर्मचाऱ्यांसाठी तपासणीसह मोफत औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि वेळेच्या अभावामुळे आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष होणाऱ्या या घटकांसाठी हे शिबिर एक अत्यंत उपयुक्त आणि दिलासा देणारे ठरले.
“आरोग्य हीच खरी संपत्ती आणि माणूस वाचला पाहिजे” या तत्त्वावर कार्य करणारी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र ही संस्था निलेश सांबरे प्रेरणादायी नेतृत्वात समाजातील प्रत्येक घटकासाठी आरोग्याच्या क्षेत्रात आशेचा किरण ठरत आहे. हे शिबिर म्हणजे त्यांच्या व्यापक समाजकल्याणदृष्टीचा आणि सेवाभावाचा जिवंत प्रत्यय ठरला.