धोत्रा, वर्हा चोरांच्या टोळीमुळे शेतकरी हैराण; कुर्हा पोलीस निरीक्षकांच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
तिवसा: वर्हा, धोत्रा शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातून चोरट्यांनी कृषी पंपाचे वायर, झटका मशीनी आणि विहरीवरील मोटारी चोरण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांचे ओलीताअभावी नुकसान होत आहे. कृषी पंपाच्या साहित्यांमध्ये येणारे अल्युमिनियम, तांब्याचे तार अत्यंत महाग चोरीच्या बाजारात विकल्या जाते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात चोरी झाल्यात त्या शेतकऱ्यांना बिलाचे बंधन न पाळता त्यांची पोलीस तक्रार स्वीकारून अशा चोरांच्या टोळीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी कुर्हा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत अमरावती जिल्हाधिकारी आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.
आधीच शेतकरी आधीच अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे सर्वांगाने आर्थिक अडचणीत सापडला आहे. गेल्यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे आधीच शेतकरी संकटात आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. अद्याप, गेल्यावर्षीच्या खरडपट्टीची नुकसान भरपाईचे अनुदान सुद्धा शेतकऱ्यांना मिळाले नाही. येवढ्या मोठ्या संकटातून उभा राहण्यासाठी शेतकरी पुन्हा प्रयत्न करतो आहे. सोयाबीनचे पीक हातून गेल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बीत गहू, हरभरा पिकांची लागवड केली आहे. मात्र, त्यामध्येही शेतकऱ्यांना शेकडो अडचणीचा सामना करावा लागतो आहे.
दहेगाव धरणावरून वर्हा येथील शेतकरी आपल्या पिकांसाठी पाणी घेत असून, त्यांचे दैनंदिन ओलित सुरू असते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून मौजा धोत्रा शिवारातील परिसरात शेतकऱ्यांच्या विहिरी, बोर आणि तलावातील मोटर, शेतातील झटका मशीन,केबल चोरीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे ओलीत ठप्प पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या मोटार, केबल, झटका मशीन चोरी प्रकरणात सखोल गंभीर तपास करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी केली आहे. यावेळी जयंत तायवाडे, सुरेंद्र मेश्राम, निलेश मदनकर, स्वप्नील इंगोले, दिनेश कामडी, ज्ञानेश्वर वाघ, प्रवीण हटवार, सागर लाकडे यांची उपस्थिती होती.
या शेतकऱ्यांचे मोटर पंपावरील साहित्याची चोरी
प्रकाश पोजगे, प्रमोद जाधव, मुकुंद चिंचे, रमेश कामडी, गणेश लाकड़े, गणेश कामडी, रमेश पंचबुधे, ज्ञानेश लगड़े, सुनील धांडे, पुरुषोत्तम राऊत, रमेश कामडी, ज्ञानेश पंधरे, प्रदीप भुरे, रमेश इंगोले, अतुल उमप, विजय टाले, दिगांबर उमप, दिपक उमप, प्रल्हाद इंगोले, अनंत काळे
शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्यावर्षीची आर्थिक नुकसान अजून भरून निघाले नाही, डोक्यावर कर्जाचा बोजा त्यात आता रब्बीच्या हंगामात चोरट्याच्या सुळसुळाटामुळे शेतकऱ्यांच्या कृषी साहित्याच्या चोरीने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने यामध्ये सखोल तपास करून चोरट्यांना गजाआड करावे. – प्रशांत कांबळे, सामाजिक कार्यकर्ता
