राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळेपर्यंत बोथे गुरूजींनी पद्मश्री स्विकारू नये

Share

सामाजिक कार्यकर्ता प्रशांत कांबळे यांनी पत्रकार परिषदेत मांडली भुमीका

तिवसा: ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामीण भारताच्या विकासाचा आणि स्वच्छतेचा विचार मांडणारे वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व थोर महापुरूषांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा या मागणीसाठी तिवसा येथील शासकीय विश्राम गृहावर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग तर खंजिरी भजनांनी स्वातंत्र्य सैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे आणि जपान मधील जागतिक धर्म परिषद आणि विश्वशांती परिषदेमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जोपर्यंत भारतरत्न पुरस्कार केंद्र सरकार घोषीत करत नाही. तोपर्यंत अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाचे महासचिव जनार्दनपंथ बोथे गुरूजी यांनी पद्मश्री पुरस्कार स्विकारू नये असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी केले आहे.

वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमुर्ती गाडगेबाबा, क्रांतीसुर्य महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, उपाख्य डाँ.पंजाबराव देशमुख यांना केंद्र सरकारने भारतरत्न द्यावा अशी मागणी यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. केंद्र सरकारने वर्ष २०२४ मध्ये पहिल्यांदा पाच भारतरत्न पुरस्काराची घोषणा केली होती. त्यापैकी चार पुरस्कार मरणोत्तर व्यक्तींना दिले होते. त्यानंतर यावेळी आता केंद्र सरकार विविध पुरस्काराची घोषणा करण्याची शक्यता आहे. नुकतेच पद्मश्री पुरूस्काराची घोषणा केली आहे. त्यामुळे येत्या काळात केंद्र सरकार इतरही पुरस्काराची घोषणा करतांना महाराष्ट्रातील थोर महापुरूषांना न्याय देण्याची मागणी यावेळी केली आहे. विशेषत: देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठ्या प्रमाणात योगदान असलेल्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना यावेळी भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी यावेळी शिरजगाव मोझरी येथील गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष सुरेश येरणे यांनी केली आहे. यावेळी पत्रकार परिषदेत शिरजगाव मोझरी येथील गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष सुरेश येरणे, सदस्य कैलाश पुरी, देवेंद्र घाटोल, विजय कुरळकर, भुषण विघ्ने यांनी यावेळी पत्रकार परिषदेत आपली मते मांडली.

यांना मिळाले आतापर्यंत मरणोत्तर भारतरत्न

– लाल बहाद्दुर शास्त्री १९६६ मरणोत्तर

– के.कामराज १९८३ मरणोत्तर

– विनोबा भावे १९८३ मरणोत्तर

– एम.जी.रामचंद्रन १९८८ मरणोत्तर

– डाँ.बी.आर.आंबेडकर १९९० मरणोत्तर

– राजीव गांधी १९९१ मरणोत्तर

– वल्लभभाई पटेल १९९१ मरणोत्तर

– मौलाना अबुल कलाम आझाद १९९२ मरणोत्तर

– गुलझारीलाल नंदा १९९७ मरणोत्तर

– अरुणा असफ अली १९९७ मरणोत्तर

– जयप्रकाश नारायण १९९९ मरणोत्तर

– मदन मोहन मालवीय २०१५ मरणोत्तर

– नानाजी देशमुख २०१९ मरणोत्तर

– भुपेन हजारीका २०१९ मरणोत्तर

– कर्पुरी ठाकुर २०२४ मरणोत्तर

– चौधरी चरण सिंह २०२४ मरणोत्तर

– पी व्ही नरसिंह राव २०२४ मरणोत्तर

– डाँ.एम एस स्वामिनाथन २०२४ मरणोत्तर

सोमवारी केंद्र सरकारला निवेदन देण्याची मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्म्रू यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासह महाराष्ट्रातील थोर महापुरूषांनाही भारतरत्न देण्याच्या मागणीचे निवेदन पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारी गुरूदेव भक्तांसह महापुरूषांच्या विचारांच्या नागरिकांनी तहसिल कार्यालयात मोठ्या संख्येने एकत्र येण्याचे आवाहन शिरजगांव मोझरी येथील गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष सुरेश येरणे यांनी केले आहे.

भारताचे पहिले राष्ट्रपती डाँ.राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांच्या कार्यामुळे त्यांना राष्ट्रसंत ही पदवी बहाल केली होती. त्यामुळे ज्यांना देशाच्या राष्ट्रपतींनी राष्ट्रसंत म्हटले, त्यांनाच देशाच्या सर्वोच्च नागरी संन्मान मिळु नये हा राष्ट्रसंताचा अपमान आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने याची दुरूस्ती करावी – कैलाश पुरी, सदस्य, गुरूदेव सेवा मंडळ, शिरजगांव मोझरी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना घरोघरी पोहचवण्याचे काम बोथे गुरूजींनी केले आहे. राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेचा प्रचार प्रसार सुद्धा त्यांनी केला आहे. गुरूदेव सेवा मंडळाचे कार्य सुद्धा त्यांनी जगभर पसरवले आहे. त्यांना पद्मश्री मिळाल्याने आम्हाला आनंदच झाला आहे. आमच्या घरी दिवाळी साजरी झाली आहे. मात्र, जोपर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार दिल्या जात नाही. तोपर्यंत गुरूजींनी पद्मश्री स्विकारू नये असे गुरूदेव भक्त म्हणून आम्ही त्यांना आवाहन करतो आहे – प्रशांत कांबळे, सामजिक कार्यकर्ते


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Floating Button Join Group